बेळगाव महानगर पालकची निवडणूक होऊन ४ महिने पूर्ण झाल्यावर अखेर महापौर–उपमहापौर निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. सरकारने या दोन्ही पदांचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.
बेळगावच्या महापौर-उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यापासून आता महापौर-उपमहापौर कोण होणार याबाबत तीव्र कुतूहल निर्माण झाले आहे. बेळगावचे महापौरपद सामान्य महिला तर उपमहापौरपद मागास ब प्रवर्गाच्या महिलेसाठी जाहीर झाले आहे. या दोन्ही पदांचे आरक्षण जाहीर होताक्षणीच इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
महापौर पदाच्या शर्यतीत ३ उमेदवारांची नावे आघाडीवर आहेत. ब्राह्मण समाजातून वाणी जोशी, लिंगायत समाजातून सविता पाटील आणि मराठा समाजातून सारिका पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महापौरपद बेळगाव दक्षिण मतदार संघाला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर उपमहापौरपद बेळगाव उत्तर मतदार संघाला मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आ. अभय पाटील यांचा निर्णयच अंतिम असेल असे मानण्यात येत आहे. पुढील ५ वर्षेसुद्धा हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. कारण ५८ प्रभागाच्या बेळगाव महापालिकेत ३५ प्रभागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. सध्या पालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक आहेत. तसेच काँग्रेसचे नगरसेवकही कमी आहेत. त्याशिवाय भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्याने येणारी ५ वर्षे बेळगाव पालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यापाठोपाठच महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीची तारीखही लवकरच जाहीर केली जाईल अशी अपेक्षा आहे. येत्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही निवडणूक घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.