State

सरकारला ६ महिने पूर्ण; कोणतीही सरप्राईज घोषणा करणार नाही : बोम्मई

Share

जनतेला समस्या आल्या की, तातडीने त्या सोडवण्याचे काम आमचे सरकार करते. त्यामुळे १०० दिवस  पूर्ती, महिने पूर्ती असे काही आमच्याकडे नसते. सतत जनकल्याण करण्याचे काम सरकार करत आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले

मंत्रिमंडळ सभेपूर्वी आज बेंगळुरातील आरटी नगरातील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, अजेंड्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठक होईल. त्यानंतर अन्य अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाचे नियंत्रण कसे करायचे यावर तज्ज्ञांना अहवाल देण्यास सांगितले आहे. अहवाल येताच पुढील निर्णय घेऊ. सध्या तज्ज्ञांसोबत सभा घेणार नाही. त्यांनी अहवाल दिल्यानंतरच सभा घेऊ. मंत्र्यांनी काही विषय मांडल्यास त्यावर मंत्रिमंडळात जरूर चर्चा करू असे बोम्मई म्हणाले.

उद्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, तसेच उद्याच त्यांना मुख्यमंत्री पद स्वीकारून ६ महिने होत आहेत. यानिमित्त काही विशेष घोषणा करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोम्मई म्हणाले, मी माझा वाढदिवस कधीच साजरा केलेला नाही. मात्र ६ महिन्यात कोणकोणती कामे केली, त्याचा जनतेला काय उपयोग झाला याबाबत छोटी पुस्तिका जारी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

कोणतीही सरप्राईज घोषणा करणार नाही, सरकारला ६ महिने पूर्ण झाले म्हणून कोण काही घोषणा करतात का? असा सवाल करून बोम्मई म्हणाले, आमचे सरकार जनतेच्या समस्या जाणणारे, सोडवणारे सरकार आहे. जेंव्हा जेंव्हा जनतेला समस्या आल्या तेंव्हा तेंव्हा आम्ही त्या सोडवल्या आहेत. जोंधळा खरेदी केंद्रांवर सर्व शेतकऱ्यांना विक्रीची संधी देण्याचा आदेश बजावला आहे. नाचणी खरेदी सुरु ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ समितीची मंजुरी घेऊन शेतकऱ्यांना अनुकूल निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Tags: