विजापूर जिल्ह्यातील जुमनाळ हे गाव जलजीवन मिशन अंतर्गत कार्यान्वित असलेले गाव आहे. या गावात पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत तुडवडा जाणवत आहे. अद्याप उन्हाळा दूर असूनही आतापासूनच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने नागरिक शासन आणि जनप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
विजापूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जुमनाळ या गावातील लोकसंख्या ७ हजार इतकीच आहे. येथील पाणी पुरवठा मंडळ आणि ग्रामपंचायतीने घरोघरी पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे. परंतु प्रत्येक भागाला त्या त्या ‘रूट’ नुसार आठवड्यातून एकदा पाणी पुरविण्यात येत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे.
या कारणास्तव या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शासनाची व्यवस्था पोहोचून देखील सरकारने अद्याप योग्य रीतीने पाणीपुरवठाची सोय केली नाही. गावात एकूण पाच वॉर्ड आहेत. आठवड्यातून एकदा प्रत्येक वॉर्ड ला पाणी पुरवठा करण्यात येतो. आळीपाळीने पाणी पुरवठा करण्यात आल्यास महिनाभर पाण्याची वाट पाहावी लागेल का? हा प्रश्न येथील जनतेला भेडसावत आहे.
कोल्हार तालुक्यातील कृष्णा नदीतून विजापूरला पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याची सोय जुमनाळ ग्रामस्थांना देखील करण्यात यावी. जेणेकरून पाण्याची कमतरता कमी होईल. योग्यप्रकारे प्रत्येक वॉर्डला पाणी पुरवठा होईल. नागरी पाणी पुरवठा आणि मलनिःसारण मंडळाला अद्याप १८ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. यासाठी या भागात पाणी पुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचे झाल्यास प्रत्येक टँकरसाठी १ हजार रुपये मोजावे लागतात. प्रत्येकाला हा खर्च झेपणारा नसून या भागात उद्भवलेली पाणी समस्या तातडीने दूर करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
जुमनाळ गाव हे जल जीवन मिशन योजनेंतर्गत येते. या गावात जल जीवन मिशन कामकाजाची सुरुवात झाली आहे. जेजेएम कामकाजाला सुरुवात झाली आणि सध्या हे कामकाज पूर्णत्वास येत असतानाच पाण्याची समस्या उद्भवली आहे. जुमनाळ जिल्हा पंचायतीने जुमनाळ ग्रामस्थांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्यास अनुकूल ठरेल. यासंदर्भात जिला पंचायत सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या गावात पिण्याच्या पाण्याची इतकी मोठी समस्या निर्माण झाली असून लहान मुलेही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना आढळून येत आहेत. उन्हाळा येण्यापूर्वीच निर्माण झालेल्या या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.