Athani

न्या. गौड यांच्या निषेधार्थ अथणीत कडकडीत बंद

Share

 रायचूर येथे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ अथणीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने, व्यापारी आस्थापने बंद ठेवल्याने बंद संपूर्ण यशस्वी झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा न्या. गौड यांनी अवमान केल्याच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी पुकारलेला अथणी बंद मंगळवारी संपूर्ण यशस्वी झाला. शहरातील सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवून व्यापारी, नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भव्य निषेध मोर्चा काढला. यावेळी न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या चपलांचा हार घातलेल्या प्रतिमेची आंबेडकर चौकातून बाजारपेठेतून बुधवार पेठ, बसवेश्वर चौक, मिरज-कागवाड रस्त्यावरून आंबेडकर चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तेथे मानवी साखळी करून न्या. गौड यांच्या धिक्काराच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

यावेळी निदर्शकांना उद्देशून बोलताना दलित नेत्याने सांगितले की, रायचूर येथे जिल्हा न्यायाधीशासारख्या जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या न्या. मल्लिकार्जुन गौड यांनी बाबासाहेबांची प्रतिमा काढेपर्यंत मी ध्वजारोहणाचा येणार नाही असे सांगून प्रतिमा हटविण्यास भाग पाडले. या कृतीने त्यांनी थोर घटनाकार बाबासाहेबांचा अवमान केला आहे. त्यांची कृती निषेधार्ह आहे. याबद्दल त्यांना सेवेतून बडतर्फे केले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्यावर ऍट्रॉसिटी आणि देशद्रोहाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करून तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली. या घटनेला इतके दिवस उलटूनही सरकार मौन पाळून आहे. सरकारने न्या. गौड यांच्यावर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

आणखी एका दलित नेत्यानेही न्या. गौड यांच्या बेशिस्त वर्तनाबद्दल सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तडीपार करण्याची मागणी केली. सरकारने ही कारवाई न केल्यास सर्व दलित एक होऊन हातात वीला घेऊन उग्र आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी बोलताना मुस्लिम समाजाचे नेते अस्लम नालबंद म्हणाले, न्या. गौड यांनी केलेला बाबासाहेबांचा अवमान म्हणजे संपूर्ण समाजाचा, देशाचा अवमान आहे. बाबासाहेबानी केलेल्या कायद्याने, घटनेने देशात सरकारे चालत आहेत. बाबासाहेब नसते तर आम्ही कुठे असतो याची कल्पना करवत नाही. अशा महान व्यक्तीचा अवमान करणाऱ्या न्या. गौड यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुस्लिम समाजही या घटनेचा तीव्र निषेध करतो असे त्यांनी सांगितले बाईट

यावेळी विविध दलित व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राकेश मैगुर, आपली मराठी, अथणी

 

 

 

Tags: