Belagavi

बेळगावच्या नभात परदेशी पक्षांचा संचार; ५० हुन अधिक प्रजातीचे पक्षी दाखल

Share

 एरव्ही बेळगावच्या नभात दिसणारे विविध रंगांचे, आकाराचे मनमोहक पक्षी पाहून बेळगावकर आश्चर्यचकित होत आहेत. विणीचा हंगाम साधण्यासाठी ५० हुन अधिक प्रजातीच्या परदेशी पक्षांचे बेळगावात आगमन झाले आहे. बेळगाव पालिकेचे कर्मचारी आणि प्रतिभावान वन्यजीव छायाचित्रकार आनंद पिंपरे यांनी अशा पक्षांची सुंदर, छायाचित्रे टिपली आहेत.

होय, बेळगावच्या आकाशात सध्या नवे पाहुणे भरारी घेताना दिसत आहेत. ५० हुन अधिक प्रजातीचे हे परदेशी पाहुणे म्हणजेच विविध प्रकारचे पक्षी सध्या बेळगाव परिसरात आगमन झाले आहे. बेळगाव  व्हॅक्सिन डेपो, बळ्ळारी नाला परिसररासह गर्द झाडीच्या, निसर्गसंपन्न ठिकाणी आणि खानापूर तालुक्यातील नदी परिसरात हे पक्षी आढळून येत आहेत. विणीचा हंगाम संपेपर्यंत साधारणपणे मार्चच्या अखेरपर्यंत हे पक्षी तेथे वास्तव्य करणार असून, त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी निसर्ग छायाचित्रकार सरसावले आहेत.

या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने सी गल, बार हेडेड गुज, पेंटेड स्टोर्क, ब्लॅक हेडेड क्रेन, ब्लॅक स्टोर्क, स्मॉल प्रांटीकॉल, पिन तेल डक आदी नवे पक्षी खानापूर परिसरात आले आहेत. तर आशियाई ओपन बिल स्टोर्क, ब्लॅक हेडेड ईबीस, स्पून बिल, रोडिशेल डक, स्ट्राबेरी मुनिया, स्कली बेस्टेड मुनिया, व्हाईट डॉटेड मुनिया, स्टील्थ सॅण्ड पायपर, ब्लॅक हेडेड स्पिल्ट, ग्रीन बीइटर, ब्राउन वुड पीकर, कॉपर स्मिथ बार्बेट, ग्रीन चिक बार्बेट, पिकॉक आदी प्रजातीच्या पक्षांचा समावेश आहे.

स्थलांतर करून आलेल्या पक्षांमध्ये लांब पायांच्या पक्षांची संख्या अधिक आहे. हे पक्षी तिबेट, हिमालय पर्वत परिसर, दक्षिण भारत, समुद्री भागातील गोवा आदी भागातून आले आहेत अशी माहिती वन्य जीव छायाचित्रकार आनंद पिंपरे यांनी दिली. बेळगाव परिसरातील नदी-नाल्यांच्या परिसरात डिसेंबर ते मार्चअखेरही मुबलक प्रमाणात पाणी असते. या काळात पाणी पातळी हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे पक्ष्याना खाद्याचा तुटवडा भासत नाही. याठिकाणी त्यांना मासे, जलजीव, कीटक आदी खाद्य मुबलक मिळते. त्यामुळे या काळात परदेशी पक्षी बेळगाव परिसरात स्थलांतर करून जगण्यासह विणीचा हंगामही साधतात अशी माहिती पिंपरे यांनी दिले.           

बेळगाव महापालिकेत सेवा करण्यासह वन्यजीवांची विशेषतः पक्षांची छायाचित्रे टिपण्याची हौस आनंद पिंपरे यांनी जपली आहे. त्यांनी टिपलेल्या छायाचित्रातून परदेशी पक्षांचे मनोहारी दर्शन घेता येते.

 

Tags: