Belagavi

बेळगाव मनपाची अर्थसंकल्पपूर्व सभा

Share

 बेळगाव महानगर पालिकेच्या २०२२२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तयारीसंदर्भात आज पूर्वतयारीची सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ होते

बेळगाव महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीच्या सभेत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ, मनपा प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री हुग्गी-गुंजेरी, कार्यकारी अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना व सल्ले घेण्यात आले.

यावेळी बोलताना उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी सांगितले की, बेळगावात अनेक सक्षम उद्योग आणि कुशल कामगार आहेत. त्यामुळे येथे उद्योगांच्या वाढीला वाव आहे. परंतु मार्केटिंगची योग्य व्यवस्था नाही. ती केली पाहिजे. तसेच औद्योगिक वसाहतीत पाणी, रस्ते आदी मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे उद्योगांना अडचणी येत आहेत. या सुविधा मनपाने पुरविल्या पाहिजेत अशी मागणी केली.  यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना बेळगाव ट्रेडर्स फोरमचे सतीश तेंडोलकर यांनी, व्यापार-दुकान परवान्यासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबण्याचे ठरले होते. मात्र त्यात अद्याप सुधारणा झाली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. शहरातील प्रमुख ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्याला प्राधान्य देण्याची मागणी केली. शहरात महिलांसाठी आणि इतरांसाठी शौचालये नसल्याने सर्वांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालये आणि काही ठिकाणी बससेवा पुरविण्याची मागणी त्यांनी केली.

 यावेळी काही नागरिकांनी शहरातील स्मशानभूमीच्या विकासावर पालिकेने भर देण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यास याकामी शहरातील अनेक संघ-संस्था हातभार लावण्यास तयार असून त्यादृष्टीने कार्यवाही व्हावी असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, शहरात आवश्यक असणाऱ्या सुधारणांबाबत नागरिकांची मते ऐकून घेतली आहेत. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी याबाबत स्मार्ट सिटी आणि पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून तरतूद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सभेला उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बेळगाव सिटीझन कौन्सिल, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

 

Tags: