शेतकऱ्यांच्या जवळचा आणि अगदी कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेतकऱ्याच्या घरातील जनावरे! आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जनावरांना अत्यंत जिव्हाळ्याने शेतकरी जपतात. विजापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील एक बैलजोडी सध्या अशीच प्रसिद्ध झाली आहे. या बैलजोडीची किंमत चारचाकीपेक्षाही महाग असून या बैलजोडी साठी लाखोंची मागणी येत आहे.
उत्तर कर्नाटकातील सण, यात्रा, उत्सवादरम्यान बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांना शेतीच्या दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा, यासाठी अशा स्पर्धांचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येते. विजापूर जिल्ह्यातील अतालट्टी या गावातील मुत्ताप्पा या शेतकऱ्याच्या घरातील बैलजोडी सध्या लोकप्रिय ठरत आहे. ठिकठिकाणी आयोजित केलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत हि बैलजोडी बहुमानाला पात्र ठरत आहे. यामुळेच या बैलजोडीला सध्या लाखो रुपयांची मागणी आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनाचा किताब पटकावणाऱ्या या बैलजोडीला लाखो रुपयांची किंमत जरी आली तरी आपण हि बैलजोडी विकणार नसल्याचे शेतकऱ्याचे मत आहे.
डौलदार. दिमाखदार आणि पिळदार शरीरयष्टी असलेल्या या बैलजोडीसाठी मुत्ताप्पा दररोज पौष्टिक आहार पुरवितात. दररोज पाचशेहे ते सहाशेहे रुपये खर्च करून प्रत्येक महिन्याला १८ हजार रुपये खर्च होतात. या बैलजोडीला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणाऱ्या मुत्ताप्पा यांना खर्चापेक्षाही जनावरांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे. आपल्या घरासमोर लाखो रुपये किमतीची जनावरे बाळगण्यात आपल्याला मोठी श्रीमंती मिळत असल्याचे मुत्ताप्पा यांचे म्हणणे आहे.
विजापूर जिल्ह्यातील अतालट्टी या गावातील ही बैलजोडी सध्या लोकप्रिय ठरत आहे. बैलजोडी शर्यतीत मानाचे स्थान पटकाविणाऱ्या या बैलजोडीला लाखोंची मागणी होत असली तरीही बैलजोडीच्या मालकाला मात्र या बैलजोडीची विक्री कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीत विकण्याची इच्छा नसल्याचे मत आहे.