Belagavi

पोलिसांच्या टोईंग कारवाई विरोधात एससी, एसटी नेत्यांचा संताप

Share

बेळगाव शहरात दुचाकी वाहने टोईंग करून घेऊन जाण्याच्या संख्येत वाढ होत चालली आहे. याविरोधात बेळगाव एस सी एस टी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचप्रमाणे रस्त्यावर पोलीस कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना किरकिर करण्यात येत असल्याविरोधात देखील दलित नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी एससीएसटी समाजासोबत तक्रार बैठक घेतली. यावेळी आपल्यावर होणारा अन्याय निदर्शनास आणून देण्यात आला.

या बैठकीत बोलताना दलित नेत्यांनी पाणी समस्या, आंबेडकर भवन शुल्क, तसेच इतर समस्यांसंदर्भात माहिती दिली. यावेळी सदा कोलकार, बाबू पुजारी यांच्यासह इतरांनी शहरात दुचाकी वाहनचालकांना उद्भवणाऱ्या समस्याही निदर्शनास आणून दिल्या. रहदारी पोलिसांकडून दुचाकी वाहन चालकांना देण्यात येणार नाहक त्रास, अडीअडचणीच्या वेळी पार्किंग करण्यात आलेली दुचाकी टोईंग करणे, अशा गोष्टींचा विरोध यावेळी करण्यात आला.

रहदारी पोलिसांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. प्रत्येक वेळी कारवाईचा बडगा न उगारत जनतेची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी ५ मिनिटे आधी सूचना देण्यात यावी, सामान्य जनतेला १६५० रुपयांचा दंड भरणे शक्य नाही. ही दंडाची रक्कम कमी करण्यात यावी, असा आग्रह या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीला दलित समाजाचे नेते आणि पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Tags: