जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांच्याहस्ते गुरुवारी उद्यमबाग पोलीस ठाण्यातील कायदा सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
होय, बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात जनतेला मोफत कायदा सेवा देण्यासाठी कायदा सहाय्य केंद्र सुरु करण्यात आली आहेत. उद्यमबाग पोलीस ठाण्यातील कायदा सेवा केंद्राचे उदघाटन आज जिल्हा मुख्य व सत्र न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.
केंद्राच्या उदघाटनानंतर बोलताना जिल्हा न्या. जोशी म्हणाले, जनतेला मोफत कायदा सेवा-साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात लीगल एड क्लिनिक्स सुरु केली आहेत. या केंद्रांवर प्रत्येकी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांनी या केंद्रांना भेट देऊन कायदा सेवा घ्यावी हा यामागचा उद्देश आहे. राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाच्या संकल्पनेतून या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांमध्ये सर्वाना वकिलांच्या माध्यमातून कायदा सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेने या केंद्रांचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाच्या आदेशावरून या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. कायदेशीर अडचणी, तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन मिळावे असा उद्देश यामागे आहे. त्यामुळे आज जिल्हा मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांच्याहस्ते सांकेतिकरीत्या पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील कायदा सेवा केंद्रांचे उद्यमबाग पोलीस ठाण्यात उदघाटन करण्यात आले आहे. जनतेने याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
यावेळी डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी चंद्रप्पा, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव देवराज अरस, उद्यमबाग पोलीस ठाण्याचे सीपीआय धीरज शिंदे आदी उपस्थित होते.