Belagavi

बेळगाव भाजपात गट-तट नाहीत; मी पक्ष नाही सोडणार : अभय पाटील

Share

 बेळगाव जिल्हा भाजपात गटतट नाहीत. मुख्यमंत्री बोम्मई याना भेटलेल्या शिष्टमंडळात मीसुद्धा होतो, पण बेळगाव दक्षिण मतदारसंघाच्या विकासाबाबत चर्चा केली. जारकीहोळी ब्रदर्सच्या विरोधात तक्रारीबाबत काहीच चर्चा झाली नाही असे . अभय पाटील यांनी स्पष्ट केले.

बेळगावात रविवारी भाजपमधील गटबाजीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, तुम्ही हा गट, तो गट म्हणत आहात. याबाबत अन्य कोण बोलले ते मला माहित नाही. मी पक्षाच्या संघटनेतून आलेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये गट-तट नसतात हे मला माहित आहे. बेळगाव भाजपात सगळे काही आलबेल आहे. म्हणूनच तर पक्ष भक्कम आहे असे सांगून, मुख्यमंत्री बोम्मई यांच्या घरी बंद दाराआड बैठक झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जारकीहोळी ब्रदर्सबाबत प्रतिक्रिया देताना आ. अभय पाटील म्हणाले, मी माझ्या मर्यादेत आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपात कोणी येऊ शकेल, पण भाजप चिडून कोणी दुसऱ्या पक्षात जाणार नाही. कोणाला सीएम व्हायचे आहे त्यांना बजेटनंतर उत्तर मिळेल. सतीश जारकीहोळी यांनी पक्षांतर पर्व सुरु होणार असल्याचे विधान केले होते. त्याबाबतच्या प्रश्नावर, तुमच्याकडे दुसरे प्रश्न असतील तर विचार, मी पक्ष सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. त्यामळे मला हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. पक्ष संघटनेच्या बाबतीत पक्षच योग्य निर्णय घेईल. पक्ष संघटनेतून आलेल्याना पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असे आ. पाटील म्हणाले.

आ. पाटील म्हणाले, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित होणार आहे. पण या काळात विधिमंडळाचे संयुक्त अधिवेशन होणार की पुढे ढकलणार हे माहित नाही. अधिवेशनापूर्वी महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक झाली पाहिजे. महापौर-उपमहापौर कोण होणार हे ठरलेले नाही. पक्षाचे हायकमांड आणि कोअर कमिटीत याचा निर्णय होईल. तोच अंतिम असेल. निवडणुकीची तारीख जाहीर होताच कोअर कमिटीची सभा घेण्यात येईल. नगरसेवकांची मतांवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करून पक्षश्रेष्ठींना उमेदवारांची नावे कळविण्यात येतील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून गोव्यात प्रचार करणार आहेत. गोव्यात आमच्या राज्यातील नागरिक आमच्या पक्षाच्या बाजूने आहेत. मीसुद्धा त्यांना भेटून आश्वासन दिले आहे. निवडणुकीनंतर पुन्हा भेटून यांच्या समस्या जाणून घेईन. केवळ निवडणुकीपुरते नव्हे तर नेहमी त्यांच्या समस्या मी सोडवितो. आमचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास त्यांच्या समस्या आणून देतो असे आ. अभय पाटील म्हणाले.

एकंदर, बेळगाव भाजपमध्ये कसलेच गट-तट नाहीत अन मी पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही असे आ. अभय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Tags: