एरव्ही घरे आणि दुकानांना लक्ष्य करणाऱ्या चोरटयांनी आता देवादिकांनाही लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. बेळगावातील समर्थनगरातील श्री रेणुका मंदिरात शनिवारी चोरटयांनी देवीचे लाखो रुपयांचे दागिने लांबवले.
होय, इतके दिवस घरे आणि दुकानांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या शर्विलकांनी आता देवांचाही पिच्छा पुरवला आहे. चक्क मंदिरे फोडून चोरी करण्याच्या घटना बेळगावात वाढल्या आहेत. शहरातील जुन्या पी. बी. रोडवरील समर्थनगरातील श्री रेणुका यल्लम्मा देवस्थानात दुसऱ्यांदा झालेल्या चोरीत देवीचे सोन्याचांदीचे सुमारे अडीज लाख रुपये किंमतीचे दागिने लांबवले आहेत. शनिवारी रात्री ही चोरी करण्यात आली.
आज, रविवारी सकाळी मंदिराचे पुजारी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता मंदिराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांनी मार्केट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. या चोरीमुळे समर्थनगर, तानाजी गल्ली परिसरातील रहिवाशांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपूर्वीच बेळगावातील पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात चोरटयांनी देवाचा मुकुटच चोरला होता. मार्केट पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन मंदिर व्यवस्थापनाकडे तो परत केला होता. आता समर्थनगर रेणुका मंदिरात दुसऱ्यांदा चोरी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.