रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी यांनी योग्य वापर केल्यास येत्या २०२३ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सरकार येईल हे नक्की आहे. १६ नव्हे तर २५ आमदारांना भाजपात आणण्याची शक्ती जारकीहोळी यांच्याकडे आहे. पुढील निवडणुकीत पुन्हा २५ आमदारांना निवडून आणण्याची शक्ती या उभयतांमध्ये आहे, असा विश्वास विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय.
गोकाकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी म्हणाले, भाजपाविरोधात काँग्रेस किंवा कुणीही षडयंत्र रचले तरी काहीच साध्य होणार नाही. रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी या उभयतांना गोकाकमधील जनतेला मोठा पाठिंबा आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. रमेश जारकीहोळी केवळ १६ नव्हे तर २५ आमदारदेखील भाजपमध्ये आणू शकतात, एवढी शक्ती आणि सामर्थ्य त्यांच्यात आहे. आगामी काळात भाजप नेत्यांनी लक्ष देऊन रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी यांना प्राधान्य दिल्यास उत्तम होईल, असेही लखन जारकीहोळी म्हणाले.
यानंतर काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी सिध्दरामय्यांनी दिलेल्या आवाहनासंदर्भात बोलताना लखन जारकीहोळी म्हणाले, काँग्रेसमधील सिद्धरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे हे आमचे नेते आहेत. गुरु आहेत. परंतु काँग्रेसमध्ये आधीच स्वयंघोषित नेते असल्याकारणाने राज्यात काँग्रेसचे पतन होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय भाजपमधून देखील कोणीही काँग्रेसमध्ये जाणार नाही. अथणी आणि बेळगाव जिल्ह्यातील नायक षडयंत्र करून भाजप सरकारचा बळी देत आहेत, असे लखन जारकीहोळी म्हणाले.
भाजपमध्ये होत असलेल्या गुप्त बैठकांसंदर्भात बोलताना लखन जारकीहोळी म्हणाले, उमेश कत्ती यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून बेळगाव महानगरपालिकेवर महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीसंदर्भात सदर बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या पराभवासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. बेंगळूर आणि बेळगावमधील स्वयंघोषित काँग्रेसी नेत्यांमुळे काँग्रेस ची ताकद कमी झाली असल्याचे लखन जारकीहोळी म्हणाले.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना लखन जारकीहोळी यांनी काँग्रेस प्रवेशाबद्दल साफ नकार दिला असून आपल्या भावांसोबत योग्य निर्णय घेऊन, त्यांचा योग्य वापर करून भाजपचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय भाजपाला आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी रमेश आणि भालचंद्र जारकीहोळी यांचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचा सल्लाही दिला आहे.