रायचूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हुक्केरी येथे विविध दलित संघटनांनी आंदोलन छेडले.
हुक्केरी शहरातील गेस्ट हाउस मध्ये जमलेल्या विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने होत असलेल्या दलितांवरील अत्याचार आणि अन्यायाचा निषेध केला. दलित संघटनांमधील एकी मोडून काढण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे आरोप यावेळी करण्यात आले. आमच्या हक्कासाठी आणि संविधान जपण्याच्या उद्देशाने सर्व दलितांनी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत उदय हुक्केरी यांनी यावेळी व्यक्त केले.
रायचूर येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात न्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी हुक्केरी येथील विविध दलित संघटनांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. हुक्केरी येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान निषेध मोर्चा द्वारे प्रशासकीय भवन येथे पोहोचून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हा अनुसूचित जाती अन्याय विरोधी समितीचे सदस्य सुरेश तळवार म्हणाले, रायचूर मध्ये जिल्हा न्यायाधीश मल्लीकार्जुन गौड यांनी डॉ. बाबासाहेबांचा अवमान केलाय. त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली पदावरून कमी करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यानंतर संकेश्वर नगरपालिकेचे सदस्य दिलीप होसमनी यांनीही न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध नोंदविला.
या आंदोलनात विविध दलित संघटनेचे नेते प्रकाश मेलाखे, मल्लिकार्जुन राशिंगे, बाळूसाहेब पांढरे, बी. के. कांबळे, केम्पन्ना शिरहट्टी, विक्रम करनिंग, आनंद केळगडे, कल्लाप्पा कट्टी, गुडेंनावर, मारुती तलवार, शंकर तिप्पनायक, विठ्ठल अमरगोळ, प्रमोद कुगे आदी उपस्थित होते.