Banglore

कर्नाटकाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प

Share

आपला वाढदिवस साजरा करण्याची आपली इच्छा नसून आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने कर्नाटकाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा आपला निर्धार आहे, असे विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे.

बेंगळूर मधील आर टी नगर येथील आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री बोलत होते. कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेसह पक्षातील ज्येष्ठ, पदाधिकारी, राष्ट्रपती, पंतप्रधानांनी ट्विट करत मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मतदार संघातील जनतेनेही शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शहा यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिल्या असून या साऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्वांच्या शुभेच्छा घेऊन राज्याच्या विकासासाठी मी प्रयत्नशील असेन. राज्याच्या संपूर्ण विकासासह राज्यातील गरीब जनतेच्या विकासासाठी, सर्व जाती- धर्माच्या विकासासाठी, महिलांच्या आणि युवकांच्या विकासासाठी मला शक्ती मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

सरकारला ६ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसौध येथील बँकेट हॉल येथे गेल्या सहा महिन्यात सरकारने केलेल्या कामांच्या आढाव्यासंदर्भात माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने कोविड परिस्थिती निवारण्यासाठी सरकारने उचलली पाऊले, महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेले कार्य यासह इतर कामांचा आढावा असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी अर्थसंकल्पासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, काही दिवसातच अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तरतूद करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याची आर्थिक स्थिती आणि राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेऊन हा अर्थसंकल्प सादर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

आपल्या वाढदिवसाच्या औचित्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचा आणि राज्यातील जनतेचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या वर्षाचे बजेट असा शब्द वापरून कुतूहल निर्माण केले आहे. भाजप सरकार आगामी बजेटमध्ये कोणत्या तरतुदी करेल, आणि याचा फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेसह राज्यातील जनतेला कसा होईल हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

Tags: