बेळगाव उत्तर मतदार संघात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण कामकाजातून ९०५ घरांच्या कामकाजाला खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तसेच कर्नाटक झोपडपट्टी विकास महामंडळाच्या वतीने बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील रुक्मिणी नगर झोपडपट्टी परिसर, रामनगर तसेच चव्हाट गल्ली येथील ९०५ घरांच्या निर्मितीच्या कामकाजाचा शुभारंभ खासदार मंगला अंगडी यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचे घर असावे, या पंतप्रधानांच्या स्वप्नानुसार बेळगावमध्ये आवास योजनेंतर्गत गृहनिर्माण योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीतील रुक्मिणी नगर झोपडपट्टी परिसर, रामनगर तसेच चव्हाट गल्ली येथील ९०५ घरांच्या निर्मितीच्या कामकाजाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. या कामकाजाचा कोनशिला समारंभ आज इथे पार पडत असून नागरिकांनी या योजनेचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन मंगला अंगडी यांनी केले.
यानंतर बोलताना शहर उत्तरचे आमदार अनिल बेनके म्हणाले, देशात २०२३-२४ पर्यंत देशात कोणीही बेघर राहू नये, यासाठी पंत्रप्रधानांनी गृहनिर्माण योजना आखली आहे. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांनीही बेळगावमध्ये अनेक ठिकाणी गृहनिर्माण केले आहे. आता आपल्या मतदार संघातील ९०५ घरांच्या निर्मितीचा कोनशिला समारंभ पार पडला असून लारवाडमध्ये १४०० घरे निर्मितीचा आमचा संकल्प आहे. अनुसूचित, मागासवर्गीय समाजासाठी सरकारच्यावतीने अधिकाधिक सुविधा देण्यासंदर्भात प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे अनिल बेनके म्हणाले.
२०२३-२४ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकासाठी गृहनिर्माण करण्याच्या योजनेंर्तगत बेळगावमध्ये शुभारंभ करण्यात आला असून जनतेने याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. परंतु हि योजना केव्हा पूर्णत्वाला येईल याबद्दल मात्र जनतेतून प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहे.

