प्रजासत्ताक दिनी जिल्हा न्या. मल्लिकार्जुन गौड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ बेळगावात आज आंबेडकर क्रांती युवा वेदिकेतर्फे निदर्शने करण्यात आली.
रायचूर येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनी स्थानिक जिल्हा न्या. मल्लिकार्जुन गौड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगून त्यांचा अवमान केल्याची घटना घडली होती. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. बेळगावात सोमवारी या घटनेच्या निषेधार्थ आणि न्या. गौड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर क्रांती युवा वेदिकेतर्फे निदर्शने करण्यात आली. वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 
यावेळी बोलताना आंबेडकर क्रांती युवा वेदिकेचे महेश गाडीवड्डर म्हणाले, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेबांचा फोटो पूजास्थळावरून हटवून न्या. गौड यांनी केवळ बाबासाहेबांचाच नव्हे तर समस्त दलित समाजाचा आणि देशाचा अवमान केला आहे. अशा महाभागांना सवलत देणाऱ्या सरकारला आधी लाज वाटायला हवी. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्या. गौड यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संदेश द्यायला हवा. अन्यथा समस्त दलित समाज एकवटून उग्र आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला.
आंबेडकर क्रांती युवा वेदिकेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दलित बांधवानी या निदर्शनात भाग घेतला.

