बेळगाव, दि. २९ : विजयनगर-हिंडलगा येथील श्रेयस चंद्रकांत कुंडेकर याने राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक पटकावले आहे.
राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतासह श्रीलंका, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान व चीनमधील कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यात श्रेयस कुंडेकर याने १३ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, ब्लॅक बेल्ट तसेच ‘शोडान’ (फर्स्ट डॅन)’ किताब पटकावला आहे. यापूर्वी सांगली येथे झालेल्या निमंत्रितांच्या कराटे स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक मिळवले आहे.
तो कराटे प्रशिक्षक भरमानी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून वनिता विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मान्यताप्राप्त एसकेएसए इंटरनॅशनल संस्थेच्या मान्यतेने एशियन कराटे फेडरेशनने उदयपूर येथे या स्पर्धा घेतल्या.

