बेळगाव दक्षिण मतदारसंघात राबविण्यात यावयाच्या विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आ. अभय पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघात राबविण्यात यावयाच्या विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. यावेळी आपल्या मतदार संघात करावयाच्या विकास कामांवरून आ. अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मतदार संघातील इस्पितळांसाठी ८ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. 
मच्छे गावात सरकारी इस्पितळ बांधण्यासाठी समाज कल्याण खात्याच्याताब्यात असलेल्या जमिनीचे हस्तांतर आणि येळ्ळूर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रीडांगण बांधण्याच्या प्रस्तावावरून आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
बैठकीला कामगार विमा इस्पितळ, समाज कल्याण, महसूल, भू-दाखले, कामगार खाते, हेस्कॉम, झोपडपट्टी विकास महामंडळ, महानगरपालिका, आरोग्य आणि कुटुंब कल्याण खाते आदी सरकारी खात्यांचे व महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते.

